पुण्यातील एमपीआयडीसह गंभीर गुन्ह्यांतील दोन फरार आरोपी म्हसवड पोलिसांच्या जाळ्यात!
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड | प्रतिनिधी
पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना म्हसवड पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान शिताफीने पकडले. अजित सागर कसबे (वय २१) आणि ओंकार महेश थोरात (वय २५) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याविरुद्ध एमपीआयडीसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या कारवाईमुळे म्हसवड पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त सुरू असताना अंधाराचा फायदा घेऊन दोन इसम संशयास्पदरीत्या वावरताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्परतेने हालचाल करत दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी सुरुवातीला आपली ओळख सांगण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली.
चौकशीदरम्यान पहिल्या आरोपीचे नाव अजित सागर कसबे (वय २१, रा. मल्लिकपेठ, मोहोळ, जि. सोलापूर; सध्या रा. चव्हाणनगर, धनकवडी, पुणे) असे, तर दुसऱ्या आरोपीचे नाव ओंकार महेश थोरात (वय २५, रा. साईमाऊली हाइट्स सोसायटी, जांभूळवाडी, कात्रज, पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले.
अधिक तपास केला असता, सहकारनगर पोलीस ठाणे, पुणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३(५) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात हे दोघे फरार आरोपी असल्याचे समोर आले. तसेच सहकारनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याविरुद्ध एमपीआयडीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचेही समजले.
दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-२ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, संशयास्पदरीत्या वावरल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०५/२०२६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे तसेच पोलीस अंमलदार शहाजी वाघमारे, प्रकाश इंदलकर, अनिल वाघमोडे आणि सतीश जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
.

