औंध येथे २०१६ मधील दुहेरी मृत्यूच्या अपघातप्रकरणी ट्रक चालकास एक वर्ष सक्तमजुरी
व्हिजन २४ तास न्यूज
विजयकुमार ढालपे
औंध :प्रतिनिधी
पूसेसावळी-औंध मार्गावरील संभाजीनगर येथे २०१६ मध्ये झालेल्या भीषण अपघातप्रकरणी औंध येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने ट्रक चालकाला एक वर्ष सक्तमजुरी व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल मा. न्यायमूर्ती दर्यावर्दी यांनी दि. १५ मे २०२६ रोजी दिला.
याबाबत औंध पोलीस ठाण्यात C.R. No. 47/2016 अन्वये IPC कलम 279, 304(A), 337, 338 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134(a)(b) सह 187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणातील आरोपी प्रवीण शिवाजी निकाळजे (वय 29, रा. कोर्टी ता. कराड) याने दि. १६ मे २०१६ रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास पूसेसावळीहून औंधकडे मालवाहू ट्रक (MH-11-AL-702) भरधाव व निष्काळजीपणे चालवत समोरून जाणाऱ्या नवीन पल्सर मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात मोटारसायकल चालक प्रफुल्लकुमार सुरेश भोसले व मागे बसलेले जयदीप जनार्दन भोसले हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
अपघातानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता पसार झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन PSI डी. आर. अतिग्रे यांनी केला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री. प्रकाश विजय जोशी यांनी काम पाहिले.
न्यायालयाने आरोपीस IPC कलम 304(A) अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, तसेच इतर कलमान्वये स्वतंत्र शिक्षा सुनावल्या. सर्व शिक्षा एकत्रित चालणार असून अंतिम शिक्षा १ वर्ष सश्रम कारावास व १३ हजार रुपये दंड अशी ठोठावण्यात आली. तसेच दंडाच्या रकमेतून प्रत्येकी ५ हजार रुपये मयतांच्या वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणात पोलीस अंमलदार ए. ए. शिंदे (PC 206), औंध पोलीस ठाणे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

