केरळमधील चैनस्नॅचिंग करणारे तिघे जेरबंद; सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

तासवडे, कराड :- (प्रतिनिधी 

      केरळ राज्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पसार झालेल्या तिघा संशयितांना तासवडे टोलनाक्यावर तळबीड पोलिसांनी अटक केली. सातारा पोलिसांच्या अचूक माहिती, समन्वय आणि चाणाक्षपणामुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली असून संशयित आरोपींना पुढील तपासासाठी केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    मा. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

      पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील हेमअंबिका नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैनस्नॅचिंगची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी मारुती सुझुकी एर्टिगा (एमएच 48 सीटी 4929) या वाहनातून महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये सातारा कंट्रोल रूममार्फत तासवडे टोलनाक्यावर तातडीने नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

      त्यानंतर तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर सापळा रचून नाकाबंदी सुरू केली. दरम्यान संशयित एर्टिगा वाहन दिसताच पोलिसांनी ते अडवून ताब्यात घेतले. वाहनात तीन संशयित इसम आढळून आले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तळबीड पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्यांनी केरळमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याची कबुली दिली.

       यानंतर सातारा कंट्रोल रूममार्फत हेमअंबिका नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. केरळ पोलिसांचे अधिकारी व अंमलदार तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी व वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

     या प्रकरणी हेमअंबिका नगर पोलीस ठाण्यात गुरनं. 383/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6) व 3(5) प्रमाणे 12 मे 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे (तळबीड पोलीस ठाणे), API पंकज पवार (उंब्रज पोलीस ठाणे), पोलीस हवालदार सचिन गुरव, कुलदीप कोळी, योगेश भोसले तसेच पोलीस अंमलदार गणेश बाकले, अभय मोरे आणि महिला पोलीस अंमलदार स्मिता करपे यांनी सहभाग घेतला.

         पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांनी कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *