माण-खटाव युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेश करचे अभ्यासू, संघर्षशील युवा नेतृत्वावर पक्षाचा विश्वास; संघटन बळकट करण्याचा निर्धार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, प्रतिनिधी :
माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणारे अभ्यासू व निर्भीड युवा नेतृत्व महेश मारुती करचे यांची माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या नियुक्तीमुळे माण-खटाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून महेश करचे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महेश करचे यांनी नुकत्याच झालेल्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी शेतकऱ्यांचे वीज व पाणी प्रश्न, कामगारांचे हक्क, विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच महिलांवरील अन्यायाविरोधात सातत्याने आंदोलने व जनआंदोलने उभारून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सागर सावंत, महाराष्ट्र प्रदेश सचिव पंकज पोळ, डॉ. प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महेश करचे यांच्या नियुक्तीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार तसेच माजी जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया – महेश करचे :
“युवक काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात युवकांचे भक्कम संघटन उभारून शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करू. अन्यायाविरोधातील लढा कायम सुरू ठेवत जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी अग्रभागी राहीन,” असे महेश करचे यांनी सांगितले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *