माजी सैनिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश; पोलिसांना कारवाईचे आदेश

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

कराड | प्रतिनिधी

कराड तालुक्यातील सेवारत सैनिकाच्या आईच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अखेर प्रशासन हलले असून, सैनिक फेडरेशन व माजी सैनिक संघटनेच्या मागणीला यश आले आहे. कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कराड शहर पोलीस स्टेशनला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देणारे पत्र पाठवले आहे.

मलकापूर (ता. कराड) येथील सेवारत सैनिक सिपाई अशोक बाळू रवंदळे सध्या आसाममधील तेजपूर येथे भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांची आई कै. उषा रवंदळे (वय ४७) भाजी विक्री करून हातभार लावत होत्या.

दरम्यान, २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोयना वसाहत परिसरात भाजी विक्री करत असताना, एमएच ५० यू ३००१ क्रमांकाच्या कारने भरधाव वेगात येत तिघींना धडक दिली. या अपघातात उषा रवंदळे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात कार चालक डॉ. सुचिता अविनाश पाटील यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडवल्याचा आरोप आहे.

पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, घटनेनंतर त्वरित ब्लड सॅम्पल न घेता ते दीड दिवसांनी घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, एफआयआर नोंदवून एक महिना उलटूनही ठोस कारवाई न झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा संरक्षण समिती सदस्य यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक संघटनेने तहसीलदार, डीवायएसपी आणि कराड शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देत आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केली होती.

कराड शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी, “दहा दिवसांत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात येईल तसेच संबंधित त्रुटींची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, तहसीलदार कल्पना ढवळे यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून सेवारत सैनिकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्याने प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.

सैनिक कुटुंबाला न्याय मिळणार का? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *