म्हसवड-दहिवडी परिसरात अपहरणाच्या अफवेने खळबळ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – सपोनि संदीप पोमण यांचे आवाहन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :प्रतिनिधी 

म्हसवड व दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओमनी गाडीतून लहान मुलांचे अपहरण होत असल्याची चर्चा सोशल मीडियासह परिसरात सुरू झाली आहे. मात्र, या चर्चेमध्ये तथ्य नसून संबंधित घटनेत लहान मुलांचे अपहरण झालेले नसल्याची माहिती म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घटनेत दोन महिलांना गाडीत बसवून त्यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आल्याची घटना घडली आहे. मात्र, या घटनेला लहान मुलांच्या अपहरणाचे स्वरूप देऊन अफवा पसरवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या अफवांमुळे काही नागरिक ओमनी गाड्या अडवून वाहनचालकांना जाब विचारणे, त्यांच्याशी वाद घालणे तसेच मारहाण करण्याचे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांमुळे निरपराध नागरिकांना विनाकारण त्रास होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयित वाहन स्वतःहून अडवू नये किंवा कोणालाही मारहाण करू नये. एखादी संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी.

अफवा पसरवू नका, कायदा हातात घेऊ नका; संशयास्पद प्रकारांची माहिती पोलिसांना द्या आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन सपोनि संदीप पोमण यांनी केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *