करवडीत रविवारी राज्यस्तरीय ‘सैनिक समाज यशवंत पुरस्कार’ सोहळा!
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड | प्रतिनिधी
देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची महत्त्वाची वर्षे समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या कार्याचा गौरव आणि समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी करवडी (ता. कराड) येथे रविवारी, दि. २९ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय ‘सैनिक समाज यशवंत पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन, सातारा जिल्हा आणि यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट, वडगाव (उंब्रज) यांच्या संयुक्त विद्यमाने शिव मल्हार मल्टिपर्पज हॉल, करवडी येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष तथा ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रांतील २० कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, पत्रकारिता, संरक्षण, क्रीडा, कृषी, उद्योग आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या २० मान्यवरांना यावेळी ‘सैनिक समाज यशवंत पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
यंदाच्या पुरस्कारार्थींमध्ये साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, मनोहर शिंदे, ॲड. विद्याराणी साळुंखे, नामदेव पाटील, गोरख तावरे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रहास शेजवळ, उत्तमराव मोहित सर, डॉ. रत्नाकर जाधव, कमलाकर पाटील, संग्रामबाबा पवार, शंकर केदारी, विकास अण्णा गायकवाड, अतुल होणकळसे, सयाजी माथने, विक्रमसिंह कदम, माजी सैनिक शिवाजीराव माने, प्रा. हणमंतराव कराळे आणि प्रथमेश गायकवाड यांचा समावेश आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांचा जाहीर सत्कार; रामकृष्ण वेताळ यांचाही विशेष सन्मान
या सोहळ्यात मंत्री शंभूराज देसाई यांचा सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व माजी सैनिक संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांचा विशेष सन्मान होणार आहे. याशिवाय देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसह आजी-माजी सैनिक आणि पोलिसांचाही गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सोहळा सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि समाजातील कर्तृत्वाचा सन्मान करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
मान्यवरांची मांदियाळी उपस्थित राहणार
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार मनोज घोरपडे, अतुलबाबा भोसले, धैर्यशीलदादा कदम, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
सैनिकांच्या त्यागाचा सन्मान, शहीद कुटुंबीयांप्रती कृतज्ञता आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या गुणवंतांचा गौरव अशा त्रिवेणी संगमातून हा पुरस्कार सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे. या सोहळ्याला आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, नागरिक आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले आहे.

