म्हसवड नगरपरिषद निवडणूक : शेखरभाऊ गोरे गटाची दमदार एंट्री! शनिवारी अर्ज दाखल – रणनीतीची मोठी बैठक, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

म्हसवड :प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना म्हसवडमध्ये राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे. आज माजी नगरसेवक धनाजी माने यांच्या निवासस्थानी शेखरभाऊ गोरे गटाची महत्त्वपूर्ण रणनीती बैठक पार पडली. नगराध्यक्षांसह सर्व पदांसाठी उमेदवार अंतिम टप्प्यात असल्याचे गटाकडून संकेत देण्यात आले.

शेखरभाऊ गोरे यांच्या शहरात आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा नवा उधाण आले. “यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असून गट एकसंध शक्तीने लढणार,” असा निर्धार शेखरभाऊंनी यावेळी व्यक्त केला. तसेच शनिवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाणार, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली.

बैठकीला संतोष पिसे, सोमा कवी, रंजीत लोखंडे, विक्रम लोखंडे, धनाजी माने, रवी मोडासे, विजय साखरे यांसह गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवार निवड आणि प्रचारकार्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला असून त्यावर सर्वानुमते सहमती झाली.

गेल्या काही निवडणुकांत प्रभावी संघटना आणि मतदारांशी मजबूत संपर्क यामुळे शेखरभाऊ गोरे यांचा गट म्हसवडमध्ये एक भक्कम ताकद म्हणून ओळखला जातो. या निवडणुकीतही गटाने सर्व प्रभागांमध्ये प्रचारयुद्धाची तयारी पूर्ण वेगात सुरू केली आहे.

या घडामोडींमुळे म्हसवडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली असून प्रतिस्पर्धी गटही गोरे गटाच्या पुढील पावलावर बारीक लक्ष ठेऊन आहेत.

ही निवडणूक म्हसवडमध्ये रंगतदार आणि अटीतटीची होणार, हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *