म्हसवडमध्ये एकाच दिवशी आरोग्यसेवेचे चार उपक्रम; २६१ रुग्णांवर ओपीडीत उपचार, ६८ बालकांचे लसीकरण!
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :- प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे एकाच दिवशी आयोजन करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल सातारा यांच्या माध्यमातून मोफत कॅन्सर निदान व्हॅन शिबिर, बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आणि नियमित लसीकरण असे तीन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, शेकडो रुग्णांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला.
सिव्हिल हॉस्पिटल सातारा यांच्या मार्फत आयोजित मोफत कॅन्सर निदान शिबिरात नागरिकांची विविध प्रकारच्या कर्करोगांसाठी तपासणी करण्यात आली. यामध्ये ८० जणांची मुख कर्करोग तपासणी, २८ महिलांची स्तन कर्करोग तपासणी, २८ महिलांची गर्भाशय मुख तपासणी तसेच २८ जणांची व्हीआयए तपासणी करण्यात आली. या तपासणीत ४ जणांचे व्हीआयए अहवाल पॉझिटिव्ह आले. पुढील उपचार व तपासणीसाठी ६ रुग्णांना संदर्भित करण्यात आले, तर २ रुग्णांची बायोप्सी तपासणी करण्यात आली.
वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यास उपचारांना मदत होऊ शकते, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये कर्करोग तपासणीबाबत जनजागृती होण्यास हातभार लागला.
याच दिवशी आयोजित बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात एकूण १० लाभार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सुरक्षित व सुलभ कुटुंब नियोजन सेवांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आयोजित नियमित लसीकरण मोहिमेत एकूण ६८ बालकांचे लसीकरण करण्यात आले. बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले
विशेष आरोग्य शिबिरांसोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रातील दैनंदिन वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू होती. दिवसभरात बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) एकूण २६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर १७ रुग्णांना आंतररुग्ण विभागात दाखल करून वैद्यकीय सेवा देण्यात आली.
या सर्व आरोग्य उपक्रमांच्या वेळी प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तिवाटणे सर, डॉ. धुमाळ सर, दंतवैद्य डॉ. अविनाश पिसे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर तांबोळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, डॉ. विरकर मॅडम, तालुका विस्तार अधिकारी गंबरे रावसाहेब यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एकाच दिवशी कर्करोग निदान, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, बालकांचे लसीकरण आणि नियमित रुग्णसेवा अशा विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवडने सार्वजनिक आरोग्यसेवेप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि वेळेवर उपचार यांचे महत्त्व या उपक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

