कराड उत्तरमधील शेत पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त होणार सर्वेक्षण करून अतिक्रमणाची यादी; रस्त्यांच्या कामांना मिळणार गती — आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कराड,  : प्रतिनिधी 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मतदारसंघातील सर्व शेत पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून सर्वहंगामी वाहतुकीस सक्षम करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतमालाची वाहतूक, शेतीची मशागत व अन्य कृषी कामांसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या संदर्भातील आढावा बैठक सोमवारी कराड येथील शासकीय विश्रामगृहात आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस सहअध्यक्ष रणजित पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, मोजणी विभागासह महसूल, ग्रामविकास व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच शेत पाणंद समितीचे सदस्य दत्तात्रय शेलार, उमेश मोहिते, शैलेश चव्हाण, पवन निकम, प्रमोद कदम, पंचायत समिती सदस्य डॉ. संतोष पाटील यांच्यासह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत शेत पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे, रस्त्यांची मोजणी, प्रशासकीय अडचणी, निधीचा वापर आणि कामांना गती देण्याच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावातील पाणंद रस्ते मूळ नकाशानुसार खुले करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे नियोजन केले.

अतिक्रमण हटविण्यासाठी धडक मोहीम

कराड उत्तरमधील सर्व शेत पाणंद रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून अतिक्रमणांची यादी तयार करण्यात येणार आहे. महसूल विभाग व ग्रामपंचायतींच्या समन्वयातून टप्प्याटप्प्याने अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर संबंधित रस्त्यांची डागडुजी करून ते शेतमाल वाहतुकीस योग्य करण्यात येणार आहेत.

यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आणि शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी चांगले रस्ते असणे अत्यावश्यक आहे. अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या सहकार्याने ही समस्या कायमस्वरूपी सोडवून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा हक्काचा पाणंद रस्ता उपलब्ध करून देणार आहोत.”

साडेसात कोटींचा निधी; लांब रस्त्यांचे ग्रामीण रस्त्यात रूपांतर करण्याची शिफारस

सहअध्यक्ष रणजित पाटील म्हणाले, “आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागली आहेत. शासन स्तरावर प्रयत्न करून सुमारे साडेसात कोटी रुपयांचा निधी कराड उत्तरसाठी मंजूर करण्यात आला आहे. शेत रस्त्यांवरील अतिक्रमणांवर धडक कारवाई करून ती हटविण्यात येतील. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात येणार आहे.”

एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या अधिक लांबीच्या शेत रस्त्यांचे थेट ग्रामीण रस्त्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून शिफारस करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक तातडीची मोजणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीला नव्याने गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *