म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; रोड रॉबरीचा गुन्हा उघडकीस सराफी व्यावसायिकाला तलवारीचा धाक दाखवून लुटणारे चार आरोपी जेरबंद; ११.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :प्रतिनिधी 

देवापूर ते पळसावडे मार्गावर सराफी व्यावसायिकाला स्विफ्ट कारने धडक देऊन तलवारीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन तोळे सोने, तीन किलो चांदी, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार व हत्यार असा एकूण ११ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुमारे महिनाभरापूर्वी सराफी व्यावसायिक नवनाथ वसंत खुपकर (रा. पळसावडे) हे मोटारसायकलवरून देवापूर ते पळसावडे मार्गाने जात असताना निर्जन ठिकाणी पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर आरोपींनी त्यांना जखमी करून तलवारीचा धाक दाखवला व त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपी कारमधून सांगली जिल्ह्याच्या दिशेने पसार झाले होते. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार आणि विविध जिल्ह्यांतील गुन्हेगारांच्या नोंदींच्या आधारे तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांत संशयित आरोपींची नावे निष्पन्न केली. आरोपींचा शोध घेत असताना तिघे सोलापूर जिल्ह्यातील धुळदेव-पिलीव घाट परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

पोलीस कोठडीतील तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचे उघड झाले. एका स्थानिक गुन्हेगाराने सराफी व्यावसायिकाच्या हालचालींवर पाळत ठेवून लुटीचा कट रचल्याचे तसेच बाहेरील आरोपींना बोलावून गुन्हा घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी अजय सत्यवान शिरतोडे, शुभम दुर्योधन बोडरे, रोहित दादासाहेब जाधव (तिघेही रा. सांगोला, जि. सोलापूर) आणि सुनील मारुती मंडले (रा. देवापूर, ता. माण) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत चोरीस गेलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तीन किलो चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि हत्यार असा ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *