म्हसवडमधील आंदोलनावर नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा हल्लाबोल; ‘ठेकेदाराला ब्लॅकमेल करण्याचा धंदा’ असल्याचा गंभीर आरोप
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
म्हसवड नगरपालिकेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता राजकीय धार आली असून, नगराध्यक्षा व नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनकर्त्यांवर जोरदार निशाणा साधला. “कालचे आंदोलन म्हणजे ठेकेदाराला ब्लॅकमेल करण्याचा धंदा आहे,” असा थेट आणि गंभीर आरोप करत नगरसेवक अकील काझी यांनी आंदोलनामागील हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
म्हसवड शहरातील सुमारे ३५ ते ४० हजार नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी सुमारे ८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. ही योजना आता अंतिम टप्प्यात असून जलवाहिन्यांचे टेस्टिंग सुरू आहे. मात्र, काम पूर्णत्वाकडे जात असतानाच काही मंडळींनी गैरव्यवहाराचे आरोप करून आंदोलन सुरू केले असल्याचा आरोप नगराध्यक्षा व नगरसेवकांनी केला.
“ज्यांना योजनेची एबीसीडी माहिती नाही, त्यांनी थेट गैरव्यवहाराचे आरोप करणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे,” असा घणाघात नगरसेवक अकील काझी यांनी केला. अधिकाऱ्यांकडून माहिती न घेता, प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता आणि चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच दोष निश्चित करणे हा कोणता न्याय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार नसून, जलवाहिन्यांचे टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतरच रस्ते पूर्ववत करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कामाच्या प्रक्रियेची माहिती न घेता गैरव्यवहाराचा शिक्का मारण्याची घाई कशासाठी, असा सवाल नगरसेवकांनी केला.
“उपोषण आणि आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे; मात्र नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय स्टंटचे स्वरूप देण्याचा अधिकार कुणालाही नाही,” अशी भूमिका नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
वर्षानुवर्षे सत्ता हातात असताना म्हसवडच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करता आले नाही आणि आता दुसऱ्यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या योजना पूर्णत्वाकडे जात असताना त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून म्हसवडमध्ये रस्ते, बंधारे, पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामे झाली असून शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. आता मोठी पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात येत असताना त्याचे श्रेय किंवा राजकीय परिणाम कोणाच्या बाजूने जातील, यामुळेच काहींची अस्वस्थता वाढली आहे का, असा सवालही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
“ही योजना कोणत्याही पक्षाची खासगी मालमत्ता नसून म्हसवडच्या जनतेच्या भविष्यासाठी आहे. गैरव्यवहाराचे आरोप करणाऱ्यांनी प्रसिद्धीच्या स्टंटपेक्षा कागदपत्रे व पुरावे सादर करावेत. प्रशासनाकडे तक्रार करावी आणि चौकशीला सामोरे जावे. मात्र, केवळ आंदोलन करून म्हसवडच्या विकासकामांना बदनाम करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा नगराध्यक्षा व नगरसेवकांनी दिला.
“ज्यांना विकास करता आला नाही, त्यांनी निदान विकासकामांमध्ये अडथळे तरी आणू नयेत,” असा टोला लगावत पत्रकार परिषदेत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना थेट आव्हान दिले.
दरम्यान, पाणीपुरवठा योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याऐवजी वस्तुस्थिती कागदपत्रांसह जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

