माणगंगा शैक्षणिक संकुलाने ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात दिली नवसंजीवनी
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, प्रतिनिधी
मासाळवाडी, म्हसवड येथील माणगंगा शैक्षणिक संकुल आयोजित स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी साईनाथ वाळेकर, प्राचार्य डी. वाय. ओंबसे (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दहिवडी-पंढरपूर), म्हसवड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सखाराम बिराजदार, गट शिक्षणाधिकारी पिसे, म्हसवड केंद्रप्रमुख दीपक पतंगे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नितीन दोशी भाऊ होते. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा गौरव करताना सांगितले की, “संस्था ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभ ठरत आहे. संस्थेच्या वाढत्या यशामागे डॉ. वसंत मासाळ, त्यांच्या पत्नी सौ. सविता मासाळ, सचिव नारायण मासाळ, उपाध्यक्ष सुखदेव मासाळ आणि संचालक मंडळ यांचे अथक प्रयत्न आहेत.”

साईनाथ वाळेकर साहेब यांनी संकुलातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक करताना सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देण्यात माणगंगा शैक्षणिक संकुलाचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शनामुळे संकुलाने नावारूपाला येण्याची खात्री आहे.”
प्राचार्य डी. वाय. ओंबसे यांनी संकुलात सुरू असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी मिळत असल्याचे सांगितले. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याची शिफारस केली.
कार्यक्रमात अहिंसा नागरी सह पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वॉटर कूलर उपलब्ध करून दिला गेला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना भरभरून प्रतिसाद मिळाला, तर मेरिट यादीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


