पत्रकार संजय भोकरे यांना झेड प्लस सुरक्षा द्या; कटाच्या सूत्रधाराला तात्काळ अटक करा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अर्धापूरचे प्रशासनाला निवेदन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज
उद्धव सरोदे
नांदेड /अर्धापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक, राज्य संघटक, संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सांगली पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केल्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अर्धापूर तालुका शाखेच्या वतीने संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत संजय भोकरे यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी तसेच कटामागील मुख्य सूत्रधाराला त्वरित अटक करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समीक्षा संपादक रूपेश पाडमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष उध्दवराव सरोदे व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १३ मे) तहसीलदार अर्धापूर, उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेड ग्रामीण (अर्धापूर) तसेच पोलिस निरीक्षक अर्धापूर यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांच्या आवाजाला दडपण्याचा आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्याचा हा गंभीर प्रकार असून कट उघडकीस आल्यानंतरही धोका कायम आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळून कठोर व निर्णायक कारवाई करावी.

पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देताना सांगितले की, “पत्रकारांचे संरक्षणच सुरक्षित नसेल तर लोकशाही धोक्यात येईल. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या व कट रचणाऱ्या शक्तींना कुणीही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

या निवेदनावर तालुकाध्यक्ष उध्दवराव सरोदे, आनंदराव सिनगारे, शेख बशीर, वल्ली मोहम्मद खतिब, वैभव माटे, शेख मौला, अॅड. गौरव सरोदे, बिभिषण कांबळे, राजकिरण गव्हाणे, राजेश पंडित, व्यंकटी गोरे, राजेश पळसकर, गंगाधर सूर्यवंशी, सय्यद मंजूर अली, विजय सरोदे, अमोल सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *