म्हसवडमधील गाळे लिलावात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी; पालिकेचा नियमांचा हवाला देत नकार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, :(प्रतिनिधी )

येथील पालिका कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिलावात म्हसवड शहरातील स्थानिक रहिवाशांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी केली होती. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.

म्हसवड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्यापारी गाळे तसेच आरक्षण क्रमांक ९ मधील गाळे म्हसवड नगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक व कार्यक्षेत्रातील नागरिकांनाच देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे सोनवणे यांनी निवेदनात नमूद केले होते. त्यामुळे गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत स्थानिक नागरिकांचा प्राधान्याने विचार करावा, अशी त्यांची मागणी होती.

या मागणीवर म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी सोनवणे यांना लेखी उत्तर दिले आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या मालमत्तेचा लिलाव महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ तसेच लागू शासन निर्णय, नियम, अटी व शर्तीनुसार पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ स्थानिक रहिवासी असल्याच्या कारणावरून लिलाव प्रक्रियेत स्वतंत्र प्राधान्य देण्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९२ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण) (सुधारणा) नियम, २०२५ मध्ये कोणतीही तरतूद अथवा शासन निर्देश उपलब्ध नसल्याचे मुख्याधिकारी डॉ. माने यांनी पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे स्थानिक रहिवाशांना स्वतंत्र प्राधान्य देण्याची मागणी सध्या मान्य करणे नगरपरिषदेला शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यात गाळ्यांचा लिलाव सुरू झाल्यानंतर मंजूर अटी व शर्तीनुसार सर्व पात्र इच्छुकांना समान संधी उपलब्ध करून दिली जाईल, असेही नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *