माण-खटावकरांच्या हक्कासाठी निर्णायक लढा : १ मेपासून शिर्के यांचा आमरण उपोषणाचा इशारा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड / प्रतिनिधी

माण-खटाव तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता सोहम शिर्के यांच्या नेतृत्वाखाली आता जनआंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. नालाबिल्डिंग प्रकरणासंदर्भात काल प्रशासनाला अंतिम निवेदन देण्यात आले असून, येत्या काही दिवसांत तालुक्यातील सर्व मूलभूत समस्यांबाबत व्यापक स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारले जात असून, माण-खटाव तालुक्यातील पाणीटंचाई, वीजपुरवठा, शिक्षण व्यवस्था, आरोग्य सुविधा, रोजगारनिर्मिती, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, ग्रामीण विकास तसेच नालाबिल्डिंगसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.

या संदर्भात मा. मुख्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव, कृषी मंत्री, जलसंधारण मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित सर्व विभागांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिर्के यांनी दिली.

दरम्यान, प्रशासनाने दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास १ मे २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील आम आदमी पार्टीचे राज्यस्तरीय नेते देखील सहभागी होणार असल्यामुळे या आंदोलनाला व्यापक स्वरूप येण्याची शक्यता आहे.

“हे आंदोलन कुणा एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण माण-खटावच्या जनतेचा आवाज आहे. आपल्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे आवाहन सोहम शिर्के यांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर माण-खटाव तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, येणाऱ्या काळात हे आंदोलन प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *