नीट प्रकरणातील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ आजाद समाज पार्टी व भीम आर्मीचे नांदेडमध्ये आंदोलन;
व्हिजन २४ तास न्यूज
ऍड.गौरव सरोदे
नांदेड | प्रतिनिधी
दिल्ली येथे नीट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ आजाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या वतीने गुरुवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रा. प्रभाकर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र व राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधितांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे बळाचा वापर करणे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना धक्का देणारे असल्याचे आंदोलकांनी म्हटले.
यावेळी प्रा. प्रभाकर वाघमारे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागविणे योग्य नसून, सरकारने तातडीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा आजाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या निवेदनात नांदेड येथील नीट पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगांवकर व इतर संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आजाद समाज पार्टीच्या महिला जिल्हा प्रभारी सौ. संध्याताई कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनायक लोहकरे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते, जिल्हा महासचिव गंगाधर गंगासागर, लोहा-कंधार विधानसभा अध्यक्ष नामदेव बुद्धे, नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष नागेश वाघमारे, भोकर विधानसभा अध्यक्ष संतोष लोखंडे, बाजीराव धोंगडे, गोविंद चाटशे, संतोष गाडे, आनंदराव गाडे, आशिष लोखंडे, पवन वाघमारे तसेच भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील भोसीकर, देवानंद जोंधळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या न्याय, सन्मान आणि शैक्षणिक हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार आजाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

