पाझर तलावावर डल्ल्याचा आरोप; परवानगी रद्द, वडगावच्या शेतकऱ्यांचा उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड , प्रतिनिधी :
     माण तालुक्यातील मौजे वडगाव येथील खोरी पाझर तलाव परिसरातील कथित अतिक्रमण आणि बेकायदेशीर विहीर खोदकाम प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. एका गट क्रमांकासाठी परवानगी घेऊन प्रत्यक्षात शासकीय मालकीच्या गट क्रमांक ८३५/२ मध्ये विहीर खोदण्यात आल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला असून, या प्रकरणी दिलेला विहीर खोदाईचा आदेश प्रशासनाने रद्द केल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

    शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ८३५/१ साठी परवानगी असताना प्रत्यक्षात पाझर तलावाच्या शासकीय जागेत खोदकाम करण्यात आले. एवढेच नव्हे तर विहीर पूर्ण होण्यापूर्वीच सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत सहा इंच व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

        शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मा. प्रांताधिकारी, दहिवडी यांनी २४ जून २०२६ रोजी यापूर्वीचा विहीर खोदाईचा आदेश रद्द केला. मात्र परवानगी देताना नेमकी कोणती प्रक्रिया राबविण्यात आली होती, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    दरम्यान, या प्रकरणात एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या प्रभावाखाली परवानगी देण्यात आल्याची तसेच त्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठ्याच्या उद्देशाने पाईपलाईन टाकण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू असून, या बाबीचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

          याच अतिक्रमणाला विरोध करणारे शेतकरी विजयकुमार दगडू ओंबासे यांच्यावर घरात घुसून मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने परिसरातील वातावरण अधिकच तापले आहे.

    घटनास्थळी भेट दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते महेश मारुती करचे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत, “पाझर तलावांवरील अतिक्रमण म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला आहे. शासकीय संपत्तीचे संरक्षण करून अतिक्रमण तात्काळ हटवावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा दिला.

      खोरी पाझर तलावातील कथित अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी आणि संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागण्यांसाठी वडगाव येथील शेतकरी, महिला व ग्रामस्थ शुक्रवार, दि. २६ जून २०२६ पासून माण-खटाव उपविभागीय अधिकारी (दहिवडी) कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

    यावेळी डॉ. प्रसाद ओंबासे, डॉ. विशाल ओंबासे, अमोल ओंबासे, साहिश ओंबासे, संजय गुलचंद ओंबासे, रामचंद्र ओंबासे, रोहन ओंबासे, हिंदुराव ओंबासे, अभिषेक ओंबासे, हृषीकेश ओंबासे, विजयकुमार ओंबासे, धर्मराज ओंबासे, संदीप ओंबासे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *