माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :प्रतिनिधी 

माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, वैभव शिंगाडे आणि अन्य सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध वरकुटे मलवडी येथे महिलेच्या तक्रारीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री घरासमोर जमाव जमवून धमकी देणे आणि मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ ऑक्टोबरच्या रात्री ११.५० वाजल्यापासून २ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत वरकुटे मलवडी येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी मुमताज खुदबुद्दीन इनामदार (वय ४३, रा. वरकुटे मलवडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, विक्रम शिंगाडे, वैभव शिंगाडे आणि त्यांच्यासोबत आलेल्या सहा अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा वाजवून त्यांचा मुलगा आरमान कुठे आहे, अशी विचारणा केली. आरमान याने ‘अँटी व्हायरस’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर विक्रम शिंगाडे यांच्याबाबत आक्षेपार्ह संदेश टाकल्याचा आरोप करत त्याला तातडीने बोलावून घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच, त्याला सोडणार नाही आणि त्याचे हात-पाय तोडू, अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

याच घटनेदरम्यान, विक्रम शिंगाडे यांच्यासोबत आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने आपल्या मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, १८९(२), १८९(३), १९०, ३३३ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे पुढील तपास करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *