म्हसळा तालुक्याची कुपोषणमुक्तीकडे यशस्वी वाटचाल : अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून गौरव
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसळा : सुशील यादव
अतिदुर्गम व ग्रामीण भाग असलेल्या म्हसळा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून ही संख्या आता शून्याच्या दिशेने पोहोचत आहे. त्यामुळे म्हसळा तालुका लवकरच पूर्णपणे कुपोषणमुक्त होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग तसेच म्हसळा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय पोषण माह २०२७’ या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते म्हसळा येथील कुणबी समाज हॉलमध्ये करण्यात आले. ‘सुपोषित बालक – सशक्त माता – समृद्ध कुटुंब’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात बोलताना मंत्री तटकरे यांनी म्हसळा तालुक्यात कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस करत असलेल्या कार्याची विशेष प्रशंसा केली. या यशाचे खरे श्रेय याच सेविका आणि मदतनीसांना जाते, असे सांगून त्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, लवकरच ‘दिवाळी भाऊबीज भेट’ देऊन त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. राज्यात काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने पाणी, पौष्टिक आहार व मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी तयार केलेल्या पौष्टिक आहाराच्या पदार्थांच्या प्रदर्शनाची पाहणी मंत्री महोदयांनी केली आणि उपक्रमांची माहिती घेतली.
या कार्यक्रमास तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी मंगेश साळी, सीडीपीओ प्रफुल्ल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत बिराजदार, पर्यवेक्षिका धनश्री चव्हाण, पल्लवी पालवे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, अनिल बसवत, सभापती बबन मनवे, नगराध्यक्ष सुनील शेडगे, गटनेते संजय कर्णिक, पंचायत समिती सदस्या प्रियांका निंबरे, समृद्धी चाचले, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, सोनल घोले, रेश्मा काणसे, संदीप चाचले, नाना सावंत, महेश घोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका इंद्रजा जंगम यांनी केले. सेविका व मदतनीसांनी सादर केलेल्या प्रबोधनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

