उंब्रज येथे कर्मवीर अण्णांची १३९ वी जयंती उत्साहात भव्य मिरवणुकीत विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते
उंब्रज : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उंब्रज येथील रयत शैक्षणिक संकुलात बुधवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालय, श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय आणि रयत इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्थानिक स्कूल कमिटी व महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य जयंत धनाजीराव जाधव (बापू), अजित संपतराव जाधव, राजवैभव दत्तात्रय जाधव, संजय पाटील, माणिक डुबल, विजयराव जाधव, तानाजीराव कदम तसेच विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य वैभव उमरदंड, महाविद्यालयाचे प्राचार्य गावडे सर, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील मॅडम आणि इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पटेल मॅडम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची उंब्रज गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. झांज, लेझीम आणि पथनाट्याच्या सादरीकरणाने मिरवणुकीत विशेष रंगत भरली. महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणासह माणिक चौक, शिवाजी चौक आणि बाजारपेठ परिसरात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्स्फूर्त सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा मिरवणुकीतील सहभाग लक्षणीय ठरला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वंचित व गरजू घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करून ‘कमवा व शिका’ या अभिनव संकल्पनेतून शिक्षणाचा प्रसार केला. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण करत विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या विचारांचा आदर्श घेण्याचा संकल्प केला.

मिरवणुकीनंतर रयत संकुलातील सर्व विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात भोजनाची व्यवस्था करण्यात आली. उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांना उजाळा देत जयंती सोहळा उत्साहात पार पडला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *