माण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, : प्रतिनिधी 

माण तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी २४ सप्टेंबर रोजी माण तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा केला. मोगराळे येथे पावसाअभावी सुकून गेलेल्या बाजरी व मुगाच्या पिकांची बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.माण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावा अथवा शासनाच्या नियमानुसार प्रत्येक जनावरामागे आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. तसेच तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली.

माण तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुलाणी यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देऊन माण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली. तसेच पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मिळावी, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासन नियमानुसार आर्थिक मदत द्यावी आणि गरज असलेल्या गावांमध्ये चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

मोगराळे, पाचवड, बिजवडी आदी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करताना शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांच्या सर्व व्यथा शासन दरबारी मांडून त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.

दरम्यान, माण तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक आदेश देऊन पीक नुकसानभरपाई, पीक विमा, चारा आणि पाणी याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

या दौऱ्याच्या नियोजनात तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी यांची भूमिका महत्त्वाची ठरली. यावेळी अंकुश नलवडे, महेश गोडसे, बाळासाहेब जाधव, विशाल गोडसे, सुभाष कलंगे, सुखदेव धुमाळ, प्रथमेश माने यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *