दहिवडी पोलिसांची धडक कारवाई; सहा ठिकाणी छापे, ११ हजार ८०० रुपयांची दारू जप्त
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी : प्रतिनिधी
दहिवडी पोलिसांनी अवैध देशी व हातभट्टी दारू विक्रीविरोधात धडक कारवाई करत माण तालुक्यातील मलवडी, राणंद, दहिवडी, शिंगणापूर, गोंदवले बु. आणि म्हसवडगड परिसरात सहा ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण ११ हजार ८०० रुपये किमतीची देशी व हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून, सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित गावांच्या हद्दीत बेकायदा व विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.
या कारवाईत ऋषीकेश विजय साळुंखे (रा. मलवडी) याच्याकडून ८८० रुपये किमतीची देशी दारू, बबन विष्णू चव्हाण (रा. शिंगणापूर) याच्याकडून ८८० रुपये किमतीची देशी दारू, अंकुश तुकाराम मदने (रा. गोंदवले बु.) याच्याकडून ४६० रुपये किमतीची हातभट्टी दारू, सुनील किसन जाधव याच्याकडून ३ हजार ८६० रुपये किमतीची दारू, अर्जुन चंद्रकांत जाधव (रा. राणंद) याच्याकडून ८०० रुपये किमतीची दारू, तर मारुती रामचंद्र सुतार (रा. म्हसवडगड) याच्याकडून ५ हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात सहा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सपोफौ प्रकाश हांगे, मोहन हांगे, नंदकुमार खाडे, चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार रविंद्र खाडे, काळेल, राम गाडवे, तनुजा खाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर, गणेश खाडे, संतोष विरकर, अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महिला पोलीस दुबळे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

