अनैतिक संबंधातून महिलेचा गळा दाबून खून; प्रियकराला पोलिसांनी घेतले ताब्यात
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड प्रतिनिधी :
अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून महिलेचा गळा दाबून तिची हत्या केल्याच्या संशयावरून कराड शहर पोलिसांनी तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. या घटनेत उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा तांबिरे (रा. शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी, कराड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सागर महादेव माने (रा. जुने मालखेड, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
मृत महिला कराड शहरातील शिवाजी स्टेडियमजवळ वास्तव्यास होती. तिचे आणि सागर माने याचे गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत असल्याचेही समोर आले आहे.
गुरुवारी रात्री दोघांमध्ये झालेल्या वादातून सागर माने याने महिलेला मारहाण करून जोराने तिचा गळा दाबल्याचा आरोप आहे. त्यानंतर महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी संशयित सागर माने याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी महिलेवर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास कराड शहर पोलिस करीत आहेत.

