म्हसवड पाणी योजनेच्या चौकशीचे आश्वासन; किशोर सोनवणेंचे उपोषण स्थगित

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, दि. २९ : प्रतिनिधी

म्हसवड वाढीव पाणीपुरवठा योजनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. तसेच केंद्रीय जल आयोगाकडूनही चौकशीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिल्यानंतर किशोर सोनवणे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले.

म्हसवड पाणीपुरवठा योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, योजनेसाठी झालेल्या निधीच्या वापराची सखोल चौकशी करावी आणि गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी सोनवणे यांनी पालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

उपोषण सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी विविध राजकीय, सामाजिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देत सोनवणे यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली होती.

दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तहसीलदार मीना बाबर यांना सातारा येथे बोलावून घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाचे आंदोलनस्थळी वाचन करण्यात आले.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय माहिती घेतली. केंद्रीय पातळीवर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. म्हसवड पाणीपुरवठा योजनेची केंद्रीय जल आयोगाकडूनही चौकशी करण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी सोनवणे यांना दिले.

यानंतर खासदार मोहिते-पाटील यांच्या हस्ते ज्यूस देऊन सोनवणे यांनी आपले उपोषण स्थगित केले. चौकशी निष्पक्षपणे होऊन योजनेतील सत्य जनतेसमोर यावे, अशी भूमिका सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

माण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी प्रकृतीच्या कारणामुळे प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहता आले नसले तरी व्हिडीओ कॉलद्वारे सोनवणे यांच्याशी संवाद साधत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिल्याबद्दल सोनवणे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

या आंदोलनाला प्रा. कविता म्हेवे, माणचे सभापती विक्रम शिंगाडे, दिलीप तुपे, युवा नेते तेजसिंह राजेणाने, मनोज पोळ, अरविंद पिसे, अजिनाथ केवटे, अशोक पिसे, बाळासाहेब माने, चंद्रकांत केवटे, परेश खोडा, सचिन लोखंडे, बबन अवदगिरी यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत उपोषणात सहभागी झाले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *