संविधान अधिवेशनाचे कुलगुरूंच्या हस्ते रविवारी सातारा येथे उद्घाटन
व्हिजन २४ तास न्यूज
सातारा :प्रतिनिधी
भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ ‘क्लस्टर अधिवेशन’ रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या सौ. लक्ष्मीबाई पाटील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील रयत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.
बीएस फोर अभियानाचे जिल्हाप्रमुख प्रो. डॉ. गोरख बनसोडे, सुशांत गायकवाड, हणमंत सकलावे, शशी वैराट आणि जनार्दन भंडारे यांनी अधिवेशनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ‘राष्ट्रीयकरण का पैगाम, निजीकरण पर लगाम अर्थात राष्ट्रीयकरणातून लोकशाही राज्य समाजवादाकडे!’ या विषयावर चर्चा होणार आहे. एमआयटी पुणे येथील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. विनोद सरतापे आणि डी. जी. कॉलेजचे डॉ. गणेश जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार असून, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सामाजिक क्रांती संस्थान, नागपूरचे ट्रेनिंग डायरेक्टर एम. डी. चंदनशिवे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
दुपारच्या सत्रात ‘मूलनिवासी बहुजन संघटनांच्या ऐक्याची मूलभूत तत्त्वे आणि कार्यक्रम’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकेरे, स्वामी शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, मुक्तीवादी संघटनेचे अॅड. मिलिंद पवार, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्ष सुजाता रणावरे, ‘सुटा’चे प्रा. डॉ. रविंद्र चव्हाण, अॅड. राजेंद्र गलांडे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना माने सहभागी होणार आहेत.
यावेळी ‘नाग नालंदा’ प्रकाशनाचे प्रो. डॉ. श्यामसुंदर मिरजकर, कास्ट्राईबचे प्रशांत मोरे, ‘सत्यशोधक’ प्रा. डॉ. दत्ता जाधव, शशी वैराट, अजय पवार, डॉ. प्रसाद ओंबासे, रफिक शेख, गणेश वाघमारे, अरुण जावळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीयीकरणातून राज्य समाजवादाचे उद्दिष्ट साध्य करणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचा सन्मान, सामाजिक परिवर्तन, लोकशाही आणि बहुजन समाजाची व्यापक एकजूट या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : सौ. लक्ष्मीबाई पाटील सभागृह, डी. जी. कॉलेज, सातारा
दिनांक : रविवार, १६ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३०

