व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हसवड पोलिसांची नागरिकांना अनोखी भेट ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे ४८ महागडे मोबाईल मूळ मालकांना परत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, प्रतिनिधी 

८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत म्हसवड पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे ४८ महागडे स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधून काढत ते आज मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी म्हसवड पोलिसांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.

म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला गहाळ मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डीबी पथकातील अंमलदारांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करत महाराष्ट्रासह परराज्यात गेलेल्या मोबाईलचा शोध घेतला.

मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींशी सातत्याने संपर्क साधून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी एकूण ४८ मोबाईल हस्तगत केले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ९ लाख ७० हजार रुपये आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्षा पूजा विरकर तसेच नगरसेवक यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेला मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.

या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमन म्हणाले की, गहाळ झालेले अधिकाधिक मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी म्हसवड पोलीस कटिबद्ध असून, अशाच प्रकारे गहाळ मोबाईल शोध मोहीम पुढेही प्रभावीपणे राबविण्यात येईल.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमन व पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नारनवर, इंदलकर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सपकाळ, नवनाथ शिरकुळे, वसिम मुलाणी व राहुल थोरात यांनी केली.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पोलिसांनी गहाळ मोबाईल परत मिळवून दिल्याने नागरिकांसाठी ही भेट ठरली असून, म्हसवड पोलिसांच्या तांत्रिक कौशल्याचे व चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *