म्हसवड नगरपरिषदेच्या विशेष सभेत आठ महत्त्वाच्या ठरावांना मंजुरी; स्थानिक व्यावसायिकांसाठी गाळ्यांचा निर्णय ठरला विशेष आकर्षण
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड | प्रतिनिधी
म्हसवड नगरपरिषदेची विशेष सभा नगराध्यक्षा पूजा सचिन वीरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात पार पडली. सभेत शहराच्या विकास, स्वच्छता, करप्रणाली, व्यापारी संकुल आणि घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील एकूण आठ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सर्व आठ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
सभेत नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी शासनाची मान्यता घेऊन कर भरणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री महाआवास योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या गृहप्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.
शहरातील रस्त्यांवर होर्डिंग, बॅनर, पोस्टर, फ्लेक्स बोर्ड व कटआऊट लावण्याबाबत नियमावली निश्चित करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्यापारी संकुल व आरक्षण क्र. ९ मधील गाळ्यांचे वाटप. या गाळ्यांचे वाटप फक्त म्हसवड नगरपरिषद हद्दीतील व्यावसायिक व नागरिकांनाच करण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण ठराव सभेने मंजूर केला. तसेच या गाळ्यांसाठी आरक्षण निश्चित करण्यासही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे स्थानिक व्यावसायिकांना व्यवसायासाठी प्राधान्य मिळणार असून शहरातील व्यापाराला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
याशिवाय फुले चौक ते काँग्रेस भवन या मार्गावरील रस्त्यावर पार्किंग व्यवस्था नियमन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
१ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे, ओला व सुका कचरा घराघरातून संकलित करणे, शहरातील सार्वजनिक रस्ते, गटारे व सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता करणे तसेच आवश्यकतेनुसार जंतुनाशक फवारणी करण्यासाठी नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
सभेच्या अखेरीस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले सर्व आठ ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केले. स्थानिक व्यावसायिकांनाच व्यापारी संकुलातील गाळे देण्याच्या निर्णयाचे शहरातील व्यापारी व नागरिकांकडून स्वागत होत आहे.

