गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक वसीम शेखचा माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते गौरव
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड | प्रतिनिधी
माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील कराटेपटू वसीम सादिक शेख याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवत माण तालुका आणि सातारा जिल्ह्याचा गौरव उंचावला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल माजी कोकण विभागीय आयुक्त तथा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते वसीमचा विशेष सन्मान करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेच्या गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या वसीमने हैदराबाद येथील गचीबोली इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित कराटे स्पर्धेत अवघ्या 20 मिनिटांत 320 ब्लॉक, 420 पंच आणि 840 बेसिक तंत्रे न थांबता पूर्ण करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गोवा येथील स्पर्धकांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत वसीमच्या वेगवान, अचूक आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित पंच व मान्यवरांची मने जिंकली.
सन्मान सोहळ्यात प्रभाकर देशमुख म्हणाले, “वसीमने केवळ गिनीज रेकॉर्डच केला नाही, तर माणच्या मातीतली जिद्द, रयत शिक्षण संस्थेचे संस्कार आणि महाराष्ट्राच्या खेळाडूंची क्षमता जगासमोर सिद्ध केली आहे. त्याचे यश लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. रयत शिक्षण संस्थेला त्याचा सार्थ अभिमान आहे.”
वसीमच्या या यशामागे गुरुकुल क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष संदीपभाऊ शिंदे, कराटे प्रशिक्षक आप्पा जाधव, अविनाश गोंधळी, नितीन सूर्यवंशी, गणेश शिंदे, विजय अवघडे, सादिक शेख, विनोद माटे आणि आदिनाथ शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आजोबा दादासाहेब शेख, आई ॲड. करिश्मा शेख, वडील सादिक शेख आणि संपूर्ण कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना वसीमने व्यक्त केली.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून माण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या वसीम शेखवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

