लग्नाचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, चौघांवर गुन्हा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड | प्रतिनिधी

माण तालुक्यातील मस्करवाडी येथे एका ९० वर्षीय शेतकऱ्याला मुलाचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची व पोलिसांत गुंतवून बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सिताराम शिवराम सूर्यवंशी (वय ९०, रा. मस्करवाडी, ता. माण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग लाला आवळे (रा. गंगोती), अनीता शिवराज सुतार (रा. पिलीव, ता. माळशिरस), नितीन अरुण शिंदे (रा. म्हसवड) आणि देवदास ज्ञानेश्वर तुपे (रा. पाणवन, ता. माण) यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ३१८(४), ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलाचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची, पोलिसांच्या गाडीतून नेण्याची व बदनामी करण्याची धमकी देत वेळोवेळी एकूण २५ लाख रुपये उकळल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या गुन्ह्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी घटनाक्रमाची पाहणी करून तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *