दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ म्हसवडमध्ये भव्य विद्यार्थी समर्थन मोर्चा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, ता. माण :

दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय, सन्मान आणि सुरक्षिततेच्या समर्थनार्थ माण तालुकास्तरीय भव्य विद्यार्थी समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 या वेळेत हा मोर्चा म्हसवड शहरात काढण्यात येणार आहे.

मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक, म्हसवड येथून होऊन अपर तहसील कार्यालय, म्हसवड येथे समारोप होणार आहे. या मोर्चामधून विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा निषेध नोंदविण्यासह न्याय, सुरक्षितता आणि सन्मानाची मागणी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आयटीआय, पॉलिटेक्निक तसेच स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

मोर्चादरम्यान “विद्यार्थ्यांचा सन्मान आमचा अधिकार”, “We Want Justice”, “Students Demand Justice”, “शिक्षण आमचा हक्क, न्याय आमचा हक्क”, “अन्यायाविरुद्ध एकच लढा – न्यायासाठी एकत्र येऊया” अशा घोषणांनी परिसर दुमदुमणार असून विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडणार आहे.

आयोजकांच्या मते, हा मोर्चा कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करत विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण, सुरक्षित शैक्षणिक वातावरण आणि लोकशाही पद्धतीने आपली भूमिका मांडण्याच्या अधिकाराच्या समर्थनासाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे माण तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थी एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *