दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलै रोजी उंब्रज बंदची हाक
व्हिजन २४ तास न्यूज
उंब्रज, ता. कराड :प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी उंब्रज बंदची हाक देण्यात आली आहे.
यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन बंद आंदोलनास सहकार्य करण्याची विनंती केली आहे. निवेदनात विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज हा लोकशाहीवरील आघात असल्याचा आरोप करण्यात आला असून, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या बंद आंदोलनासाठी नागरिक, व्यापारी व विविध सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण पद्धतीने सहकार्य करावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी कराड उत्तर तालुकाध्यक्ष अभिषेक उत्तम कांबळे, उंब्रज शहराध्यक्ष संतोष पांचाळ, सरचिटणीस समाधान दीपक चाळके, कार्याध्यक्ष अनिकेत अनिल येवले, उपाध्यक्ष प्रशांत शिवाजी बैले तसेच सचिव चंद्रकांत उत्तमराव बैले यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

