पिलीव घाटात म्हसवडच्या बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण; मारहाण करून सुमारे १.८९ लाखांचा ऐवज लुटला

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, प्रतिनिधी :

म्हसवड येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे पिलीव घाटात कार आडवी घालून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला पाणीव (ता. माळशिरस) येथील एका घरात डांबून मारहाण करत गळ्याला चाकू लावून मोबाईलचा पासवर्ड घेण्यात आला आणि ऑनलाइन व्यवहारासह रोख रक्कम व सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (११ जुलै) रात्री घडली. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसवड येथील बांधकाम व्यावसायिक व अॅक्रिटेक आनंद भागवत हे शनिवारी रात्री पिलीव येथील काम आटोपून मोटारसायकलवरून पंढरपूर–सातारा मार्गे म्हसवडकडे निघाले होते. सुळेवाडी गावाच्या हद्दीतील पिलीव घाटातील वळणावर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने त्यांचा रस्ता अडविला.

कारमधील दोन महिला व तीन पुरुषांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पाणीव (ता. माळशिरस) येथील एका घरात नेले. तेथे काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्याला चाकू लावत मोबाईलचा पासवर्ड घेतला. त्यानंतर फोन-पेद्वारे ऑनलाइन रक्कम हस्तांतरित करून रोख रक्कम आणि हातातील सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने लुटल्याची तक्रार देण्यात आली आहे.

या प्रकरणी पूनम (पूर्ण नाव माहित नाही), शंतनू (पूर्ण नाव माहित नाही) तसेच अन्य तीन अनोळखी अशा एकूण पाच जणांविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास माळशिरस पोलीस करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *