कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई; चार पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे जप्त, चौघे जेरबंद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कराड : प्रतिनिधी

कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेकायदा अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत चार देशी बनावटीची पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे आणि इतर मुद्देमालासह एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १५ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या आदेशानुसार बेकायदा अग्निशस्त्र बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने शासकीय रत्नागिरी गोदामामागील ईदगाह मैदान परिसरात सापळा रचला.

या कारवाईत अफताब बादशाह मोमीन (२४, कराड), रेहान मेहबूब शेख (१९, कराड), अमर रघुनाथ पाटील (२३, काले, ता. कराड) आणि ओंकार प्रकाश हिंगणे (२५, येडेमच्छींद्र, ता. वाळवा, जि. सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून चार देशी बनावटीची पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून ही शस्त्रे कोठून आणली, ती कोणाला विकली जाणार होती आणि यामागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धिरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव आणि सोनाली पिसाळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *