दिल्लीतील पाच महिन्यांच्या चिमुकल्याला उंब्रजच्या ‘मदत रक्ताची संघटने’चा जीवनदायी आधार; हार्ट शस्त्रक्रियेसाठी वेळेत मिळाले रक्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

उंब्रज (प्रतिनिधी) :

अंतर हजारो किलोमीटरचे… ठिकाण देशाची राजधानी दिल्ली… आणि संकटात सापडलेला अवघा पाच महिन्यांचा चिमुकला! अशा वेळी सातारा जिल्ह्यातील उंब्रजच्या ‘मदत रक्ताची संघटना, महाराष्ट्र’ हिने दाखवलेल्या तत्परतेमुळे एम्स रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्त वेळेत उपलब्ध झाले आणि एका निष्पाप जीवाला मोठा दिलासा मिळाला.

मुंबईतील एका कुटुंबातील पाच महिन्यांच्या बाळावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया होणार होती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शस्त्रक्रियेसाठी तातडीने तीन बॅग रक्ताची आवश्यकता निर्माण झाली. या कठीण प्रसंगी बाळाच्या वडिलांनी मुंबईतील रक्तदान क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मदतीची साखळी उंब्रजपर्यंत पोहोचली.

मदत रक्ताची संघटनेचे अध्यक्ष परेशकुमार कांबळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता दिल्ली पोलिसांत कार्यरत रक्तदाते रवींदर धारीवाल यांच्याशी संपर्क साधला. धारीवाल यांनी सहकारी सोनू भांकर यांना एम्स रुग्णालयात रक्तदानासाठी पाठवले. तसेच रुग्णालयाशी समन्वय साधून आणखी एका रक्तपिशवीची व्यवस्था केली. दरम्यान, बाळाच्या वडिलांनीही स्वतः रक्तदान करून उपचार प्रक्रियेला हातभार लावला.

उंब्रजसारख्या छोट्याशा गावातून कार्यरत असलेल्या या संघटनेने दिल्लीपर्यंत रक्ताची मदत पोहोचवत “रक्तदान म्हणजे जीवनदान” ही भावना पुन्हा एकदा जिवंत केली. वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मोठी मदत झाली.

गेली अनेक वर्षे मदत रक्ताची संघटना, महाराष्ट्र निःस्वार्थ भावनेने राज्यासह देशभरातील गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. दिल्लीतील या घटनेने संघटनेच्या सेवाभावी कार्यात आणखी एका प्रेरणादायी अध्यायाची भर पडली असून, अध्यक्ष परेशकुमार कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *