संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजनेचे स्वागत; कीर्तन परंपरेला नवी ऊर्जा मिळणार – इंजि. सुनील पोरे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या **’संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजने’**चे नामदेव शिंपी समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे आणि सरचिटणीस श्रीकांत फुटाणे यांनी स्वागत केले असून, हा निर्णय संत परंपरा आणि समाजजागृतीच्या गौरवशाली वारशाचा सन्मान करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इंजि. सुनील पोरे म्हणाले, संत नामदेव महाराजांनी कीर्तन, अभंग आणि भक्तीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या शिकवणुकीमुळे मानवता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाले. अशा महान संतांच्या नावाने शासनाने सुरू केलेली सन्मान योजना ही कीर्तन परंपरेला नवे बळ देणारी आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला चालना देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानमंडळात या योजनेची घोषणा केली असून, पारंपरिक कीर्तन परंपरा जपणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकारांचा शासनामार्फत सन्मान करण्यात येणार आहे. पात्र कीर्तनकारांना दरमहा सन्मानधन देण्यात येणार असून, अनुभव, कार्याचा कालावधी, वय आणि संबंधित संस्थांची शिफारस या निकषांवर लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत केली जाणार आहे.

नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने इंजि. सुनील पोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. या योजनेमुळे संत नामदेव महाराजांच्या विचारांचा व्यापक प्रसार होईल, कीर्तन परंपरेला नवी ऊर्जा मिळेल आणि नव्या पिढीला त्यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेण्याची संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *