खरातवाडी तलावाखाली हातभट्टीचा ‘अड्डा’ उद्ध्वस्त! म्हसवड पोलिसांचा धडाकेबाज छापा; ८०० लिटर रसायनासह १७ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी

      माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी गावच्या हद्दीत खरातवाडी तलावाच्या खालील बाजूस सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी धडाकेबाज छापा टाकला. या कारवाईत हातभट्टीची दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे तब्बल ८०० लिटर रसायन असा १७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     ही कारवाई गुरुवारी (दि. ९) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. वरकुटे-मलवडी गावच्या हद्दीत खरातवाडी तलावाच्या खालील बाजूस बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला.

       कारवाईदरम्यान प्लास्टिकच्या बॅरलमध्ये काढीव हातभट्टीची दारू, तसेच तीन लोखंडी व एका प्लास्टिकच्या बॅरलमध्ये दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे ८०० लिटर आंबट-गुळचट वासाचे रसायन आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला.

    याप्रकरणी अजित संजय माने (वय २९, रा. शिरताव, ता. माण, जि. सातारा) याच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (क), (ड), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलीस कॉन्स्टेबल अनिल विलास वाघमोडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लुबाळ पुढील तपास करीत आहेत.

   म्हसवड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *