सांगली PWD मधील कथित ५० कोटींच्या देयक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा! :- मनोज भिसे 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

मनोज भिसे
सांगली, दि. ८ (प्रतिनिधी) :
सांगली सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने बदली झाल्यानंतरही पदाचा कार्यभार न सोडता कथितरीत्या सुमारे ५० कोटी रुपयांची देयके वितरित केल्याच्या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी लोकहित मंच, सांगलीचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन दिले आहे.

दि. ८ जुलै २०२६ रोजी एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे भिसे यांनी ही मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतरही त्यांनी पदाचा कार्यभार न सोडता सुमारे ५० कोटी रुपयांची देयके वितरित केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा प्रकार खरा असल्यास तो शासन आदेश, आर्थिक नियमावली आणि प्रशासकीय पारदर्शकतेला हरताळ फासणारा असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिमेला धक्का देणारा असल्याचे भिसे यांनी म्हटले आहे.

शासनाच्या बदली आदेशानंतरही कार्यभार न सोडता आर्थिक व्यवहार झाले असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणामागील सर्व जबाबदार अधिकारी, कर्मचारी व संबंधित व्यक्तींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. अशा प्रकारांमुळे शासनाच्या आर्थिक शिस्तीवर तसेच जनतेच्या विश्वासावर गंभीर परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरील स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींना निलंबित करावे, कथित ५० कोटी रुपयांच्या सर्व देयकांचे सखोल लेखापरीक्षण करावे आणि शासन आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यास दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशा मागण्या लोकहित मंचने केल्या आहेत.

जनतेच्या करातून जमा होणाऱ्या पैशांचा योग्य आणि पारदर्शक वापर करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *