संत नामदेव महाराजांच्या भव्य स्मारकासाठी ९९.९९ कोटींचा निधी मंजूर जयकुमार गोरे यांच्याकडे इंजि. सुनील पोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड : प्रतिनिधी
पंढरपूर येथे श्री संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी ९९.९९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने शिंपी समाजात आनंदाचे वातावरण आहे.
पंढरपुर येथील नियोजित संत नामदेव महाराज स्मारक जागेची पाहणी करताना वंशज नामदास महाराज समवेत इंजि सुनील पोरे महेश ढवळे राजेंद्र पोरे महेश मांढरे प्रांत अधिकारी आदी
नामदेव समाजोन्नती परिषदेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर इंजि. सुनील पोरे यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिंपी समाजाचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्याचबरोबर पंढरपूर येथे श्री संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, यासाठी त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. नामदेव समाजोन्नती परिषदेचे राज्याध्यक्ष संजय नेवासकर व संपूर्ण समितीनेही या स्मारकासाठी सातत्याने प्रयत्न केले.
नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे व समितीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे या स्मारकाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार दि. २८ जून २०२६ रोजी सोलापूर येथील नियोजन भवनात झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर विकास आराखडा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पंढरपूर येथील रेल्वेच्या जागेवर संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी ९९.९९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
म्हसवड येथील कार्यक्रमात संत नामदेव महाराजांच्या भव्य स्मारकाबाबत दिलेला शब्द मंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण केल्याची भावना समाजबांधवांतून व्यक्त होत आहे. या निधी मंजुरीमुळे अनेक वर्षांपासूनचे शिंपी समाजाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्मारकाच्या उभारणीसंदर्भात स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असून, समितीच्या माध्यमातून संबंधितांची मते जाणून घेऊन स्मारकाच्या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. तसेच इंजि. सुनील पोरे यांनी सुचविलेल्या ‘संत नामदेव महाराज पायरी दर्शन मार्गा’त आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे संकेतही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्यासह संबंधित मंत्री, आजी-माजी खासदार व आमदार तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे नामदेव समाजोन्नती परिषद, सर्व शहर व जिल्हा शाखा, फडकरी, वारकरी आणि समस्त शिंपी समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.
या नियोजित स्मारकासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, उपाध्यक्ष राजन उरुणकर, बाळ आंबेकर, सुभाष मुळ, संदीप लचके, ॲड. महेश ढवळे, सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे व सर्व पदाधिकाऱ्यांचे शिंपी समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

