‘लिटिल मास्टर’ वसिम शेखची सातारा आकाशवाणीवर मुलाखत
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :-प्रतिनिधी
माण तालुक्याचा सुपुत्र आणि कराटे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणारा बाल कराटेपटू वसिम सादिक शेख याची सातारा आकाशवाणी केंद्रावर विशेष मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत २६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.
‘लिटिल मास्टर’ म्हणून ओळखला जाणारा वसिम हा मूळचा राणंद (ता. माण, जि. सातारा) येथील असून, तो रयत शिक्षण संस्थेच्या गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. लहान वयातच कराटे क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवून माण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
वसिमच्या या यशाची दखल घेत आकाशवाणी सातारा केंद्राचे सहाय्यक निदेशक तथा कार्यक्रम व प्रशासकीय प्रमुख सचिन प्रभुणे, कार्यक्रम निष्पादक प्रवीण कुलकर्णी आणि निवेदिका वसुंधरा खांडके यांनी त्याला मुलाखतीसाठी निमंत्रित केले होते. ‘क कमाल, ध धमाल’ या कार्यक्रमांतर्गत निवेदिका वसुंधरा खांडके यांनी वसिमची मुलाखत घेतली.
या मुलाखतीतून कराटे खेळाचे महत्त्व, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी, अभ्यासासोबत खेळ व विविध छंद जोपासण्याचे महत्त्व याबाबत वसिमने संवाद साधला. विशेषतः मुलींसाठी स्वसंरक्षणाच्या दृष्टीने कराटे किती महत्त्वाचे आहे, यावरही मुलाखतीत भर देण्यात आला. ‘मुलींनी पापा की परी नव्हे, तर पापा की शेरनी बनले पाहिजे,’ असा प्रेरणादायी संदेशही या मुलाखतीतून देण्यात आला आहे.
वसिमच्या यशामागे सातारा जिल्हा युनिफाईट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप शिंदे, आप्पा जाधव, अविनाश गोंधळी, नितीन सूर्यवंशी, गणेश शिंदे, विजय अवघडे, सादिक शेख आणि आदिनाथ शिंदे या ब्लॅक बेल्ट प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच कुटुंबीय, बंधू-भगिनी आणि नातेवाईकांचेही त्याला सातत्याने प्रोत्साहन मिळाले.
मुलाखतीच्या कार्यक्रमावेळी वसिमचे आजोबा दादासाहेब शेख, काका आलम शेख, आत्या हसीना इनामदार, काकी रिजवाना शेख, वडील सादिक शेख आणि आई करिश्मा शेख उपस्थित होते.
वसिमची ही विशेष मुलाखत रविवार, दि. २६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित होणार असून, नागरिकांनी व बालकांनी ती आवर्जून ऐकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

