माण-फलटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने युवा सेनेचा संवाद मेळावा म्हसवडमध्ये उत्साहात
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, प्रतिनिधी :
माण-फलटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिवसेना-युवा सेना संवाद मेळावा म्हसवड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. युवा सेनेचे माढा लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख सुजित खुर्द यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यास शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात सुजित खुर्द यांनी युवकांशी थेट संवाद साधत संघटन बळकटीकरण, युवकांची राजकीय व सामाजिक क्षेत्रातील भूमिका तसेच आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. गावागावातील युवकांनी शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माण तालुका शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब मुलाणी यांनी संवाद मेळाव्याचे महत्त्व विशद करत आपल्या चार दशकांच्या शिवसेनेतील कार्याचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. गेली ४० वर्षे शिवसेनेत कार्यरत असताना अनेक संकटे, संघर्ष आणि आव्हाने झेलली; मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी असलेली निष्ठा कधीही ढळू दिली नाही, असे त्यांनी सांगितले. शिवसैनिकांमध्ये निष्ठा, शिस्त आणि जनसेवेची भावना असणे आवश्यक असल्याचे सांगत युवकांना शिवसेनेची विचारधारा आणि संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन केले.

मेळाव्यात संघटन विस्तार, सदस्य नोंदणी, युवकांचे प्रश्न, स्थानिक विकास तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित युवकांनीही आपली मते आणि सूचना मांडल्या.
या प्रसंगी सचिन चव्हाण, हणमंत राजगे, सुभाष पवार, अमित पवार, अक्षय गावडे, अनिल मासाळ, शिवदास केवटे, म्हसवड शहराध्यक्ष वैभव गुरव, बंडूपंत मंडले यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्यामुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शिवसेना-युवा सेनेच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

