गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकला माण तालुक्याचा चिमुकला मावळा; कराटेपटू वसिम सादिक शेखचा छत्रपती उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गौरव
व्हिजन २४ तास न्यूज
सातारा, प्रतिनिधी :
माण तालुक्यातील राणंद गावचा सुपुत्र व रयत शिक्षण संस्थेच्या गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेणारा कराटेपटू वसिम सादिक शेख याने आपल्या अद्वितीय कौशल्याच्या बळावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवत सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अल्पवयात मिळवलेल्या या जागतिक यशामुळे वसिमवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज तथा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते वसिमचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही मान्यवरांनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत जागतिक स्तरावर आणखी मोठी कामगिरी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सत्कार सोहळ्यात वसिमने कराटे कौशल्याचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करत शिवप्रेमाची अनोखी झलकही दाखवून दिली. त्याची जिद्द, शिस्त, मेहनत आणि छत्रपतींप्रती असलेली निष्ठा पाहून उपस्थितांनी त्याचे कौतुक केले. खासदार उदयनराजे भोसले यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.
वसिम शेख हा आजच्या नव्या पिढीसमोर परिश्रम, चिकाटी, कर्तृत्व आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. त्याच्या यशामुळे माण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.
या प्रसंगी ‘मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा’ संस्थेचे संस्थापक सादिकभाई शेख, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, डॉ. महेश गुरव, सचिन कांबळे, अझहर मनेर, शाहरुख शेख, तनवीर मुलानी तसेच वसिमचे वडील सादिक शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वसिमच्या यशामागे सातारा जिल्हा युनिफाईट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे (ब्लॅक बेल्ट), आप्पा जाधव, अविनाश गोंधळी, नितीन सूर्यवंशी, गणेश शिंदे, विजय अवघडे आणि सादिक शेख या ब्लॅक बेल्ट प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई ॲड. करिश्मा शेख, आजोबा दादासाहेब शेख आणि कुटुंबीयांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे वसिमला यशाचा हा मानाचा टप्पा गाठता आला.
कराटे क्षेत्रातील ही जागतिक कामगिरी आणि त्यामागील कठोर परिश्रमामुळे वसिम शेख हा सातारा जिल्ह्याचा अभिमान ठरला असून भविष्यातही तो देशासाठी अशीच उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

