सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचा सैनिक फेडरेशनकडून सत्कार; माजी सैनिकांच्या समस्यांबाबत निवेदन सादर
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
उंब्रज, प्रतिनिधी :
उंब्रज पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक तथा माजी सैनिक पुत्र श्री. पंकज पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याबद्दल सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले.
सैनिक फेडरेशनचे राज्य पदाधिकारी श्री. प्रशांत कदम यांनी सर्व माजी सैनिकांच्या वतीने श्री. पवार यांची भेट घेतली. यावेळी सातारा येथे दिनांक 20 मे 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा संरक्षण समितीच्या बैठकीत उपस्थित झालेल्या विविध तक्रारींचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत कराड तालुक्यातील कोर्टी-उंब्रज येथील 84 वर्षीय माजी सैनिक मोहन थोरात यांची सुमारे 55 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. घर खरेदीसाठी रक्कम अदा करूनही संबंधितांना घराचा ताबा न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना देण्यात आली. तसेच शासनाच्या संरक्षण समिती संदर्भातील परिपत्रकानुसार वयोवृद्ध माजी सैनिकांना आवश्यक मदत व संरक्षण देऊन संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी श्री. प्रशांत कदम यांनी सांगितले की, जिल्हा संरक्षण समितीच्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांतून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित पोलीस ठाण्यांना भेटी देण्यात येणार आहेत. माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि सैनिक कुटुंबांच्या समस्या समजून घेऊन पोलिस प्रशासनाशी समन्वय साधत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात कराड तालुक्यातून करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी सैनिक, सैनिक विधवा, शहीद जवानांचे कुटुंबीय तसेच सैनिक कुटुंबांना आर्थिक फसवणूक, जमीनविषयक वाद किंवा इतर कोणत्याही अडचणी असल्यास त्यांनी लेखी तक्रारीसह सैनिक फेडरेशनशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी सैनिक फेडरेशनचे श्री. प्रशांत कदम, इंदोली माजी सैनिक संघटनेचे श्री. प्रल्हाद यादव, श्री. अशोक जाधव, ज्येष्ठ माजी सैनिक श्री. मोहन थोरात, श्री. प्रकाश जोशी आदी उपस्थित होते.

