धुळदेव येथे हातभट्टी दारू निर्मितीवर म्हसवड पोलिसांचा छापा; १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड प्रतिनिधी :
म्हसवड पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात कारवाई करत धुळदेव (ता. माण) परिसरात छापा टाकून सुमारे 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास धुळदेव गावच्या हद्दीतील घोडेखुर नाला परिसरात, बांधकामाच्या आडोशाला अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान चार लोखंडी बॅरलमध्ये एकूण 800 लिटर दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे आंबट व उग्र वासाचे रसायन (मुरवण), 15 लिटर क्षमतेचे पाच पत्र्याचे डबे ज्यामध्ये 75 लिटर मुरवण होते, तसेच 20 लिटर काढीव हातभट्टी दारू असलेला प्लास्टिक कॅन असा एकूण 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. आवश्यक नमुने रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) घेण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

या प्रकरणातील आरोपी जुबेरखान दोहारखान पठाण (रा. पठाणवस्ती, चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हा पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून गेला. त्याचा शोध सुरू असून त्याच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 144/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (क), (ड) व (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल सतीश मल्हारी जाधव यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार होगे करीत आहेत.

अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *