कराड तालुक्यात माजी सैनिक संघटना आक्रमक; सैनिकाच्या आईच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

कराड (प्रतिनिधी) :

सेवारत सैनिक सिपाई अशोक बाळू रवंदळे यांच्या आईच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कराड तालुक्यातील  माजी सैनिक    संघटना आक्रमक झाली असून, संबंधित आरोपीवर तात्काळ कारवाई करून अटक करावी, अशी जोरदार मागणी   करण्यात आली आहे. या मागणीसाठी सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा संरक्षण समिती सदस्य यांच्या  नेतृत्वाखाली तहसीलदार, डीवायएसपी तसेच कराड शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

      सिपाई अशोक रवंदळे हे सध्या भारतीय सैन्य दलात आसाममधील तेजपूर येथे कार्यरत असून त्यांचे कुटुंब मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) येथे वास्तव्यास आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या आई-वडिलांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.

        दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मलकापूर-जखिणवाडी रस्त्यावर कोयना वसाहतीजवळ भाजी विक्री करत असताना एमएच ५० यू ३००१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने वेगात येऊन प्रथम एका मुलीला धडक दिली व त्यानंतर उषा रवंदळे (वय ४७) यांच्या अंगावर गाडी चढवली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल, कराड येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

       या घटनेनंतर रात्री उशिरा कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपी डॉ. सुचिता अविनाश पाटील यांचे रक्त नमुने उशिरा घेतल्याचा तसेच २० ते २२ दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

        या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच ही केस विशेष बाब म्हणून फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच आरोपीला तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

       दरम्यान, या प्रकरणात दिरंगाई झाल्यास माजी सैनिक व कुटुंबीयांना न्यायासाठी रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढावा लागेल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती संबंधित मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.

            या वेळी सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी, माजी सैनिक व शहीद जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *