५० किमी सायकलिंग करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन
व्हिजन २४तास न्यूज
म्हसवड | प्रतिनिधी
म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुशिल पोरे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ . बी . आर . आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तब्बल ५० किलोमीटर सायकलिंग करत अभिवादन करून एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.
सालाबादप्रमाणे गेल्या १२ वर्षांपासून शुभम भारत गॅस एजन्सीचे सर्वेसर्वा तसेच सामाजिक कार्यकर्ते इंजि. पोरे हे विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांपर्यंत सायकलिंग करत आपला छंद जोपासत आहेत. दरवर्षी १४ एप्रिलला गोंदवले बुद्रुक, १० डिसेंबरला शिखर शिंगणापूर तसेच श्रावणातील पहिल्या आठवड्यात पंढरपूर येथे सायकल प्रवास करण्याची त्यांची परंपरा कायम आहे.

यावर्षीही वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता म्हसवड येथून सायकलिंगला सुरुवात केली. अवघ्या दीड तासात, सकाळी ६.३० वाजता ते गोंदवले येथे पोहोचले. तेथे जयभीम युवक ऑर्गनायझेशन आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यानंतर सकाळी ७ वाजता पुन्हा गोंदवलेहून म्हसवडकडे प्रस्थान करत त्यांनी ८.३० वाजता सुमारे सव्वातासात परतीचा प्रवास पूर्ण केला. एकूण ५० किलोमीटर सायकलिंग करत त्यांनी आपल्या जिद्दीचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

इंजि. पोरे यांच्या या उपक्रमाचे बौद्ध बांधवांसह सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे युवकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

