वीर जवान संतोष जाधव यांना सैनिक फेडरेशन चे वतीने वाहिली श्रद्धांजली*
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड :- प्रतिनिधी
येरवळे (ता. कऱ्हाड) येथील जवान संतोष अण्णा जाधव (वय ३८) यांचे निधन हृदयविकाराच्या धक्क्याने झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोष जाधव हे ७०२ इंजिनिअर प्लांट आसाम जोराहट मिलिटरी स्टेशन येथे कार्यरत होते. २३ मार्चला ते गावी सुटीला आले होते. अचानक आजारी पडल्याने कऱ्हाडच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यात त्याचे गुरुवारी रात्री निधन झाले.काल त्यांचे पार्थिव सकाळी कऱ्हाडहून येरवळे येथे आणण्यात आले. या वेळी येरवळे ग्रामस्थांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढली. यावेळी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषाणांनी वातावरण भावुक झाले.
अंत्यदर्शनासाठी गाव व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. सैन्य दलाच्या व पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. मुलगा युवराज याने भडाग्नी दिला. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. गाव व परिसरात ते अमोल या नावाने परिचित होते या वेळी सैनिक फेडरेशन सर्व आजी/ माजी सैनिक यांच्या वतीने श्री प्रशांत कदम राज्य उपाध्यक्ष व शासकीय सदस्य जिल्हा संरक्षण समिती यांनी पुष्प चक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली
यावेळी कऱ्हाडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, मंडल अधिकारी महेश पाटील, तलाठी श्री. दीपक कानकेकर, पंचायत समिती सभापती नंदा यादव, कराड तालुका सैनिक फेडरेशन उपाध्यक्ष श्री सर्जेराव देसाई, नि. सुभेदार राजाराम माळी , चिखली माजी सैनिक संघटना अध्यक्ष श्री भीमराव सावंत, वराडे सैनिक संघटना अध्यक्ष श्री रवींद्र घाडगे, येरवळे सैनिक संघटनेचे श्री सचिन लोकरे, श्री पांडुरंग यादव,श्री संतोष थोरात, कराड मिल्ट्री बॉईज हॉस्टेल अधीक्षक श्री दिलीप पाटील, श्री राजेंद्र इंगवले कोरेगाव तालुका सैनिक फेडरेशन कार्याध्यक्ष श्री हणमंत निकम व सैन्यदलातील अधिकारी, पोलिस दलातील अधिकारी व सर्व आजी/माजी सैनिक तसेच विविध मान्यवर व सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी रूपाली, मुलगा युवराज व मुलगी आराध्या असा परिवार आहे.

