“ते आले आणि… मागणी नसतानाही दिड लाखांची देणगी देऊन गेले!” शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांना मिळाली पांडुरंगाची साक्षात अनुभूती
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
विठ्ठल काटकर
कुकुडवाड / प्रतिनिधी
माण तालुक्यातील मार्डी गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मध्ये नुकताच एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. गावातील सुपुत्र आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू राम पोळ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गावी आले आणि सोबत घेऊन आले क्रिकेटची एक खास आयपीएल टीम.
शाळेला अनपेक्षितपणे लाभलेले हे आगळंवेगळं दर्शन अक्षरशः विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी आनंदाचा उत्सव ठरला. राम पोळ यांच्यासोबत आलेल्या टीममध्ये प्रवीण तांबे, शाम वागळे, अजय कदम, कृष्णा राणे, अभिजित सावंत, रवी तेलंग, दीपाली सळस्कर यांचा समावेश होता.
शाळेतील स्काऊट-गाईड पथकाने शिक्षक संताराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मान्यवरांचे जंगी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तिपर प्रत्यक्षिकं सादर करून पाहुण्यांची मने जिंकली.
या भेटीचा अविस्मरणीय क्षण म्हणजे, कोणतीही मागणी न करता राम पोळ आणि त्यांच्या टीमने शाळेसाठी दिड लाख रुपयांची देणगी जाहीर केली – त्यातील एक लाख रुपये रोख व ५० हजार रुपये किमतीचे खेळ साहित्य.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी या मनापासून आलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. संपूर्ण गावात ‘शाळेला पांडुरंग भेटला’ अशा शब्दांत चर्चा होत होती.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन स्काऊट गाईड शिक्षक संताराम पवार यांनी केले.
—
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गावी आलेले राम पोळ आणि त्यांच्या टीमने शाळेला दिलेली भेट, मागणी नसताना दिलेली देणगी – यामुळे शाळेला साक्षात पांडुरंग भेटल्याचा अनुभव आला. हा शिक्षक व विद्यार्थ्यांसाठीचा पहिलाच असा अमूल्य आणि हृदयस्पर्शी प्रसंग होता.

