म्हसळा पाणीप्रश्नावर तटकरे यांचा थेट इशारा : “काम सुरू करा, अन्यथा ठेकेदारी कायमची रद्द करू!”

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसळा | प्रतिनिधी : सुशील यादव

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी म्हसळा येथे घेतलेल्या आढावा बैठकीत आक्रमक पवित्रा घेऊन रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांवर प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदारांना चांगलेच झापले. “जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खेळण्यासारखा नाही. काम तातडीने सुरू करा, अन्यथा संबंधित ठेकेदाराची नोंदणी कायमची रद्द करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन,” असा स्पष्ट दम तटकरे यांनी भर सभेतूनच फोनवरून ठेकेदाराला दिला.

रखडलेली योजना, तटकरे यांचा संताप

तुरुंबाडी, काळसुरी आणि वारळ येथील पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांचे सुरू असलेले हाल पाहून खासदार तटकरे संतप्त झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना समोरासमोर धारेवर धरत, तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यावेळी २ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दफनभूमी प्रश्न मार्गी लावण्याची कडी

म्हसळा शहरातील बौद्ध समाजाच्या प्रलंबित दफनभूमी प्रश्नाचाही तटकरे यांनी गांभीर्याने विचार घेतला. तहसीलदार व नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून तातडीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे समाजाचा वर्षानुवर्षे अडकलेला प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रस्ते व मूलभूत सुविधांचा पण आढावा

आढावा सभेत ग्रामीण रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींबाबत सर्वंकष चर्चा झाली. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी माधव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, नगरपंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, कृषी सभापती बबन मनवे, नाझीम हसवारे आणि विविध विभागांचे अधिकारी, सरपंच व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

तटकरे यांचा कडक इशारा

प्रशासनाने कामाचा वेग वाढवावा. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही.”
— सुनील तटकरे, खासदार, रायगड

तटकरे यांच्या या थेट इशाऱ्यामुळे तालुक्यातील रखडलेली कामे वेगाने सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *