महाशिवरात्री निमित्त म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या भुयारातील स्वयंभू शिवलिंग महाशिवरात्रीला रात्रभर खुले राहणार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड ( दिलीपराज कीर्तने)
येथिल सिद्धनाथ मंदिरातील भुयारात असलेले स्वयंभू शिवलिंग दर वर्षी महाशिवरात्री निमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. आता शुक्रवार दि.8 रोजी महाशिवरात्री निमित्त हे भुयार खुले केले जाणार आहे अशी माहिती सिध्दनाथ देवस्थान चे चेअरमन गणेश गुरव ,व्हा .चेअरमन वैभव गुरव ,सचिव दिलीप कीर्तने ( गुरव )यांनी दिली .
त्यानिमित्त शिवलिंगाची महती अशी________
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आदी भागातील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ मंदिरातील भुयारात स्वयंभू शिवलिंग आहे .श्रीधरस्वामींच्या काशिखंड ग्रंथामध्ये कालभैरवाच्या उत्पत्ती विषयी देण्यात आलेल्या माहीतीनुसार शिव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला त्यावेळी गायत्री म्हणाली, शिवस्वरुप ब्रह्म अग्रगण्य आहे. सर्वकाही शिवाच्या अधिन असते त्यामुळे सर्वश्रेष्ठ शिवच आहे हे ऐकून, ब्रह्मा आणि विष्णू यांना राग आला आणि त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला. हे ऐकून शिवाचा क्रोध अनावर झाला. त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला असता भूजदंडातून महांकाळ म्हणजेच काळभैरवाची उत्पत्ती झाली .त्याचवेळी शिवाच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती सर्वांना आली. शिवशंकर लिंगरुपाने म्हसवड येथील भूयारात स्थित झाले,

त्यामुळे म्हसवडचे श्री सिद्धनाथांचे स्थान ,मुळ काशी विश्वेश्वर काळभैरव शंकराचे मानले जाते. विश्वेश्वराचे रंक्षणकर्ते म्हणून काशितही काळभैरवांचा मान प्रथम आहे.
शिवाचे रक्षणकर्ते व शिवअवतार म्हणून काळभैरव म्हणजेच सिद्धनाथ व पत्नि जोगेश्वरी .येथील मंदिराच्या गाभा-यात भुयारात असणा-या सिंहासनावर आरुढ झाले, अशी आख्यायिका आहे.
भुयार हे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांना खुले केले जाते वर्षभर हे भुयार बंद असते मंदिराच्या गाभा-यात डाव्या बाजूला भुयाराचे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या छोटेखानी पलंगावर श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती ठेवलेल्या असतात. भुयारातील शिवलिंगावर बांधण्यात आलेल्या सिंहासनावर श्री सिद्धनाथाच्या मूर्तीबाबतही एक गोष्ट आश्चर्यकारक आहे मंदिरातील सिंहासनावर असलेल्या श्रीसिद्धनाथ व माता जोगेश्वरी च्या मूर्तींना रोज सकाळी पंचामृत व गरम पाण्याने अभ्यंगस्नान घातले जाते त्यावेळी भुयारातील स्वयंभू शिवलिंगावर थेबं थेंब पाणी पडत असते. वर्षभर बंद असलेल्या भुयारातील शिवलिंगाला रोज जलाभिषेक होतो हा पौराणिक वास्तू शिल्पाचा खास नमुना आहे..


